Skip to main content

विशेष कार्यक्रम

गुरुपौर्णिमा

पौर्णिमेच्या चंद्राच्या शीतल प्रकाशाने सर्व जग उजळून निघते, त्याप्रमाणे सद्गुरूंच्या ज्ञानाच्या प्रकाशाने शिष्याचे जीवन उजळले जाते. सद्गुरू आणि शिष्य हे अत्युच्च पवित्र नाते! सद्गुरूंविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. सद्गुरुस्तवन, साधकांची मनोगते आणि सद्गुरूंचे आशीर्वचन असा हा कार्यक्रम भक्तांच्या अंतःकरणातील आपल्या सद्गुरूंबद्दलचे पवित्र भाव व्यक्त करण्यासाठी वाट करून देतो.

रामनवमी

रामनवमी हा भगवान श्रीरामांचा जन्मदिवस. या दिवशी स्वरूपयोगतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो, ज्यात भक्तांना उपासनेसहित श्रीरामांच्या सुंदर कथांच्या श्रवणाचा आस्वाद घेता येतो. श्रीराम प्रभूंचे संपूर्ण आयुष्य म्हणजे आपण अंगी बाणवाव्या अशा अध्यात्म, धैर्य, त्याग, निष्ठा आणि चारित्र्य अशा दैवी गुणांचा आदर्श वस्तुपाठच आहे. माता सीता म्हणजे कन्या, पत्नी व माता म्हणून करावयाच्या कर्तव्यांविषयीच्या निष्ठेचे प्रतीकच! तरीही परमभक्त श्री हनुमन्तांच्या नजरेतून पाहिल्याशिवाय रामायणाचा रसास्वाद चाखता येणार नाही. रामनवमीच्या कार्यक्रमात सर्व भक्तांना या दैवी कथांच्या श्रवणाचा आनंद प्राप्त होतो.

महाशिवरात्री

सर्व योग्यांचे आदिगुरू भगवान शिव यांच्या जीवनलीलाप्रसंगांवरील सुंदर निरूपण, नाथ संप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेची मध्यवर्ती शुद्ध ध्यान-उपासना आणि शिवनामांचे स्मरण अशी या कार्यक्रमाची रूपरेषा असते.

गोकुळाष्टमी

भगवान श्रीकृष्णांच्या बालक्रीडा, त्यांची मधुर बासरी, वृंदावनात भक्तांसहित केलेल्या क्रीडा, त्यांनी रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली गीता किंवा त्यांच्या दिव्य जीवनातील कोणताही प्रसंग अणि त्यातील जीवनमूल्ये यांनी बाल, तरुण आणि वृद्ध साऱ्यांनाच मोहिनी घातलेली आहे. भगवंताची गीता तर आज हजारो वर्षांनंतरही मानवांना आयुष्यातील परमेश्वरप्राप्तीचे परम ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी पथदर्शी बनून राहिली आहे. पूर्ण पुरुष भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस स्वरूपयोगतर्फे विशेष कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो.